बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. थंडीचे दिवस होते. मुंबईतली असली तरी थंडीचं कौतुक (होतं आणि) आहे आम्हाला. शाळेतल्या मुलांकडे मोबाईल फोन नव्हता तेव्हाचा काळ. तेव्हा मिळणाऱ्या अनेक सुट्ट्यांपैकी सगळ्यात आतुरतेने वाट पाहायचो ती दिवाळीची. पण याचं कारण ही तितकच वेगळं होतं.
नरक चतुर्दशीच्या पहाटे, चक्क चार साडेचारपासून घरी गजबज सुरु व्हायची. त्यावेळी आमच्या सोसायटीत एक प्रथा होती. सगळी मुलं नवीन कपडे घालून चक्क पहाटे सहा वाजेपर्यंत फटाक्याची पिशवी घेऊन मैदानात उतरायची. फटाके फोडून झाल्यावर घरी फराळ आणि मग पुन्हा खाली जाऊन धुमाकूळ. तर अशा पहाटे दादा तयार होत असताना, मी उठून खिडकीजवळच्या पलंगावर निजायचो. बाहेरच्या काळ्याकुट्ट आकाशाच्या पटलावर घरचा कंदिल संथपणे तरंगत असल्यासारखा वाटायचा. कितीतरी वर्षांपासून हा एकच कंदिल आम्ही लावत होतो ज्याचा आकार उडत्या तबकडीसारखा होता आणि त्याला छोट्या छोट्या अंडाकृती रंगीबेरंगी काचा होत्या.
दादाची हाक ऐकू येईपर्यंत पलंगावर पडून बाहेर त्या कंदिलाकडे पहात राहायचा छंद मला नकळतपणे लागला होता. मधेच कुठेतरी दूरवर एखादा फटाका फुटल्याचा आवाज यायचा आणि मग पुन्हा शांतता. आता हे वेड नक्की कधी थांबलं हे आठवत नाही. पण फटाके फोडण्यापेक्षा जास्त आकर्षण होतं ते त्या कंदिलाच्या प्रकाशाचं.
आज कितीतरी वर्षांनी पुन्हा घरी कंदिल बनवला. तो 'उडत्या तबकडीचा' कंदिल अजूनही माळ्यावर आहे. आणि योगायोगाने आजची दिवाळी पंधरा वर्षांपूर्वी होती तशीच शांत वाटतेय. आजूबाजूची माणसं आणि परिस्थिती बदलली असली तरी पहाटे उठून त्या कंदिलाच्या प्रकाशात अगदी कालच झोपल्यासारखं वाटतंय.
तुमच्या आठवणीतही अशीच एखादी दिवाळी आहे का?
Comments