मैत्री व्हावी असं काहीच साम्य नव्हतं दोघात. तो कॉलेज मध्ये खूप सिनियर आणि ती नुकतीच पासआउट झालेली. जनरेशन gap का काय म्हणतात त्याला खूप वाव होता इतका फरक!
त्यांनी शेजारी बसावं याचं निमित्त ठरली होती एका तिसऱ्याच विषयावरची कार्यशाळा. त्यात परत दोघांनाही यायचं न्हवतं हे ही ठरलेलं. तो अगदी शांत, अबोल, आपल्यातच असल्यासारखा तर तिची वर वर शांत मुद्रा, पण आतून एकदम जब व्ही मेट मधली बडबडी करीना. आपल्यासारखंच कुणीतरी शांत भेटल्याचा त्याचा आनंद काही चिरकाळ टिकणार न्हवता.
कार्यशाळा चालू होती आणि खूप वेळ दोघांपैकी कुणीही एकमेकांशी काहीच बोललंच न्हवतं. या कंटाळवाण्या शांततेला वैतागलेली ती आणि तिची सारखी चाललेली चुळबुळ त्याला दिसत होती पण बोलावं काय हे ठरवण्यातच त्याचा खूप वेळ जात होता. शेवटी तिनेच त्याचं काम सोप्पं केलं. "तुम्ही एक पुस्तक लिहिलंय ना?" असा एकदम आदरयुक्त प्रश्न त्याच्याकडे फेकला आणि त्याला हसूच आलं. हसू आवरत आणि थोडं दबूनच तो होय म्हणाला.
आज या गोष्टीला अनेक वर्ष लोटली. आयुष्यात ते दोघे आपापल्या इच्छित ठिकाणी अधिकउण्या फरकाने पोहोचलेत पण आयुष्याची बॅलन्स शीट मांडणाऱ्यांपैकी ते कधी न्हवतेच. दर रविवारी मिसळ आणि चीझ टोस्ट हाणल्याशिवाय त्यांचा वीकएंड पूर्ण होत नाही. यानंतर, दात पडलेत दोघांचेही तरीही, ताराबाई पार्कला गम्मत म्हणून लॅपा मारणं काही सोडलं नाहीये. त्याचे हात थरथरतात ब्रेक मारताना पण तिला मात्र पूर्ण कॉन्फिडन्स आहे. त्याच्या त्या पुस्तकाने त्याला काय दिलं ह्याचा हिशोब मांडण्याच्या फंदात तो कधी पडला नाही पण आज मात्र त्याची खात्री पटली होती. आपले काहीतरी घट्ट ऋणानुबंध असल्याशिवाय आयुष्य काय असं आपल्याला सप्पई गंडवायचं नाही आणि अशा वाण्ड लोकांचा उगीच लोभही नाही लावायचं!
- The Last Nomad
Comments