१० ऑक्टोबर १९७८ ची संध्याकाळ मी कधीही विसरू शकणार नाही. माझी पत्नी सौ. शुभदा आणि मी, गंगाधर निवास, दादर च्या गॅलरी मध्ये उभे राहून पावसाची मजा पाहत होतो. हवेतला गारवा मनातील उत्कंठेला गुदगुल्या करत होता. मला शुभदा बऱ्याच दिवसापासून आवडायची पण तिला कसे विचारावे या तगमगितच १ वर्ष निघून गेले. पाऊस हा प्रेमवीरांचा आवडता ऋतू का असेल याचा प्रत्यय येत होता. एकमेकांबद्दल प्रकट न केलेल्या भावना या ऋतूत अंकुरित होत होत्या. त्या दिवशी मात्र मी धीर करून शुभदाला विचारले, 'माझ्याशी लग्न करशील का?'. तिनेही लगेच होकार दिला. आपल्या माणसाच्या फक्त समोर असण्यानेच चिंब पावसातही एक वेगळीच उब जाणवू लागते याचा अनुभव मी घेत होतो. संपूर्ण आभाळ ढगाळ असतानाहि शुभदाच्या चेहरा पाहून माझ्या मनात, छोटा गंधर्वांचं, 'चांद माझा हा हसरा' हे पद आपोआप वाजू लागलं होत. त्यावेळी तिचे वय होते १६ वर्षे आणि माझे २१ वर्षे. दोघांच्याही घरून होकार आला आणि ३० मार्च १९८० रोजी आमचा विवाह झाला. पण लग्न म्हणजे नेमकी काय चीज असते हे समजावणारी खरी गम्मत पुढे घडणार होती. शुभमंगल सावधान!
लग्नापासून आम्ही कायम माझ्या आईवडिलांबरोबर राहिलो. माझी मोठा ब्लॉक घेण्याची ऐपत असतानाही, शुभदा केवळ माझ्या आईवडिलांच्या आग्रहासाठी गंगाधर निवास चाळी मध्ये सन २००१ पर्यंत कुठलीही कुरबुर न करता राहिली. काही शब्दांची आपल्याला जरी तोंड ओळख असली तरी त्यांचा अर्थ कळण्यासाठी आयुष्य खऱ्या अर्थाने जगावं लागत हे आज कळतंय.
माझ्या आईवडिलांच्या आजारपणात कोणतीही तक्रार न करता तिने त्यांची सेवा केली. माझे वडील ७ वर्षे अर्धांगवायूमुळे आजारी होते त्यांचीही सर्व सेवा केली. या सर्व गोष्टी चालू असताना माझ्या दीप्ती व रिद्धी या दोन्ही मुलींना मोठे करण्याची जवाबदारी सुद्धा तिने योग्य प्रकारे पार पाडली. हि तारेवरची कसरत करत असताना स्वतःच्या शांत टेक्स हा साड्यांचा व्यवसायही ती सांभाळत होती. खऱ्या अर्थाने ती अष्टभुजा होती कि काय असा विचार आता मनात येतो आणि माझे मलाच हसू येते. महाराष्ट्र व्यापारी पेठ, दादर, इथे तिने सलग १९ वर्षे हा व्यवसाय यशस्वीरित्या करून घरखर्चालाही हातभार लावला. माझे मॅट्रिक नंतरचे अपुरे राहिलेले शिक्षणसुद्धा केवळ तिच्याच पाठिंब्यामुळे मी पूर्ण करू शकलो. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्री असते हे माझ्या बाबतीत खोटे ठरते, कारण शुभदा कायम, मागे नसून, माझी सोबती होती. उलट तिनेच मला मार्ग दाखवला असे म्हणणेच योग्य ठरेल.
आईवडिलांच्या निधनानंतर आम्ही ठाण्याला नवीन जागी राहायला आलो. नंतर दोन्ही मुलींची लग्ने झाली. आज आम्हाला एक नातू आणि एक नात आहे. हा आमचा समृद्ध कुटुंबवृक्ष वाढवण्याचे श्रेय अर्थातच तिला जाते.
मी नुकताच निवृत्त झालो यावर माझाच विश्वास बसत नाहीये कारण शुभदा कधीच निवृत्त होणार नाही याचा प्रत्यय मला रोज येतो. सध्या मी तिच्या नवीन मसाले उत्पादनाच्या व्यवसायाला हातभार लावतो.
आम्हा दोघांमध्ये सध्या एक गमतीशीर अलिखित करार आहे. तो म्हणजे मी जेव्हा घरी येतो तेव्हा दरवाजा तीच उघडणार. खरच, दमून घरी आल्यावर तिचा चेहरा बघून सर्व शीण निघून जातो. तुझ्या असण्याने प्रेमाचा अर्थ समजला...' याहून वेगळा या अनुभवाचा अर्थ तरी काय काढावा? जर आम्ही दोघेही बाहेरून एकत्र घरी आलो तर ती दार उघडते आणि आत जाते. नंतर मी बेल वाजवतो व ती दार उघडते. तिला मी नेहमी सांगतो, ज्या दिवशी मला चावीने घरचे दार उघडायला लागेल, तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस असेल.
संपूर्ण आयुष्याकडे पुन्हा मागे वळून पाहताना, असा एकही महत्वाचा क्षण दिसत नाही जिथे ती सोबत न्हवती. माझे आईवडील, मुली आणि माझ्यासाठी तिने आजवर घेतलेल्या अथक परिश्रमांसाठी मानावे तेवढे आभार कमी आहेत. अनेक कथांमध्ये पत्नीने पतीसाठी केलेल्या त्यागाचे गोडवे गायले गेले आहेत. या पुण्यापासून आम्ही पुरुष मात्र कायम वंचित राहिलो आहोत. म्हणूनच वटपौर्णिमेला जशी ती जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे हि प्रार्थना करते तसेच मी हि रोज देवापुढे प्रार्थना करतो कि शुभदाच मला जन्मोजन्मी पत्नी म्हणून लाभू दे!
- गिरीश सुखठणकर
आज गिरीश-शुभदा यांच्या लग्नाचा ३९ वा वाढदिवस! या सुखी दाम्पत्यास अनेक शुभेच्छा!
Check out books from the Insight Stories shelf.
Comments